AnandGhan

Name:
Location: Baramati, Maharashtra, India

Thursday, September 28, 2006


आठवणी ! तुमच्या,माझ्यासर्वांच्याच मनात घर करून राहीलेल्याकाही हसविणा-या, काही रडविणा-या आणी मनाशी गुजगोष्टी करणा-या .
त्याच आठवणींना शब्दबध्द करण्याचा हा प्रयत्त्न.
आठवणी
-------------------------------------------------------------------------------------


आठवतात जेव्हा आठवणी
होते गत आयुष्याची उजळणी
उघडूनी मनाचा कवडसा
न कळे येती या कोठूनी

दूधावर येते साय जशी
तशा येती या आठवणी
धुंद मना बेधुंद करण्या
येती या आठवणी

आठवणीत असतो
प्रिय जनांचा सहवास
विरहा बरोबरच असते
पुन्हा भेटण्याची आस

आठवणी आठविता
अस्तित्व जाई शून्यात
आठवणींतच गवसे
विसरलेली वाट

होतो आजचा काल तेव्हा
आठवावा आठवणींचा ठेवा
आठवणींचीच शिदोरी
देई उभारी मना

तप्त मनावर करिती
या थंड शिडकावा
वाटते म्हणूनी मला जावे
पुन:पुन्हा आठवणींच्या गावा


Thursday, September 21, 2006अव्यक्त ओळी

अबोल बोल तुझे एकदा
बरेच काही बोलून गेले
डोळ्यांना न दिसणारे ते
ह्र्दय जाणून गेले

असतात काही प्रश्न असे
की ज्याचे नसते उत्तर
मी काही विचारताच जसे
होणे तुझे निरूत्तर

आठवतो तुला बरेचदा
एकटा असल्यावर
भेटशील का पुन्हा
कधी आयुष्याच्या वळणावर

मनात उसळणारे विचार
ओठावर येताच विरून जातात
शब्द वेडे मग माझे
त्यांची दिशा बदलतात

तुझ्या आठवणींचा पाऊस
एकदा मुसळधार बरसून गेला
उध्वस्त मनाचा बांध माझा
नकळत मोडून गेला

-----------------------------------------

नका समजू याला चारोळ्या
नसतील माझ्या तरी असतील
कुणाच्या तरी अव्यक्त ओळ्यामेघ म्हणाला धरतीला

मेघ म्हणाला धरतीला
नाते काय तुझे माझे सांग मला
ओढ तुझी अंतरीची
का वाटते मला

जीव माझा होतो व्याकूळ
पाहूनी तुझी ग्रिष्मातील तडफ़ड
दाह तुझा तो शांत करण्या
करीतो मग मीही धडपड

रूप तुझे ते बापुडे पाहून
घेतो मी मजला काजळी फ़ासून
साज तुज चढविण्या हिरवा
येतो मग मी लगबग धावून

लाभता साथ उन्हाड वा-याची
वाजवित येतो सन‌‌‌ई विजेची
बरसतो वर्षारूपाने
पुरी करण्या ओढ मिलनाची

भेटत आलो तुला युगानुयुगे
तरी नित्य नवेचि भासे
तुझे माझे प्रेमाचे नाते
होणार नाही कधीच बासे

Friday, September 08, 2006

मराठी मातीआवडती आपूली सर्वा‍ची
मराठी मातृभाषा हीची

वसली ही सह्याद्रीच्या कुशी
सांगे नाते महाराष्ट्राशी

कृष्णा,कोयना अंगणी खेळ्ती
अवघे हीचे जीवन फ़ुलविती
अवघेची सुजलाम,सुफ़लाम करिती
नांदे येथे सुख समृध्दी

गिरी शिख्ररे या सह्याद्रीची
साक्ष हीच्या मोठेपणाची
माती ही गडकोटांची
दाखवी परंपरा शौर्याची

दैवते हीची तुळ्जाभवानी
नि पंढरी विठोबाची
समृध्द ही भूमी
संत सज्जनांची

लागली येथे समाधी ज्ञानेशाची
ऐकली अभंगवाणी तुकयाची
जननी ही दासबोधाची
आणी शिव्ररायाच्या कर्तुत्वाची

वेगळ्या रंगाची ही माती
आगळ्या गंधाची ही माती
माती तुमची नि माझी
अशी ही मराठी माती